नौदलाचा पाकिस्तानला इशारा   

अरबी समुद्रात क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या जहाजांनी रविवारी अरबी समुद्रात युद्धसराव केला. त्या अंतर्गत जहाजविरोधी अनेक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली. त्यामध्ये घातक ब्रह्मोससह अन्य लघु, मध्यम आणि लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रांचा समावेश होता. लांब पल्ल्यांच्या क्षेपणास्त्रामुळे दूरवरच्या ठिकाणांना सहज लक्ष्य करता येणार आहे. एकंदरीत भारतीय नौदलाने युद्धसराव करुन पाकिस्तानला इशारा दिला आहे. नौदल कोठेही आणि कधीही आक्रमक कारवाईसाठी सज्ज असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी नुकताच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ जणांचे प्राण घेतले होते. त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांना मातीत गाडले जाईल, असा इशारा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. तसेच सिंधू नदी करार स्थगित करण्याबरोबर पाच महत्त्वांचे निर्णय घेतले होते.
 
दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात कडक कारावाईचे संकेत दिले असून लष्कर, हवाई दल आणि नौदलाकडून आक्रमक कारवाईसाठी युद्धसराव देखील विविध ठिकाणी सुरू आहे. हवाई दलाच्या लढाऊ विमानांचा सीमावर्ती क्षेत्रासह मध्य भारतात युद्धसराव सुरू आहे. लष्कराकडून सीमेवर तैनाती सुरू असून नियंत्रण रेषेपलिकडून पाकिस्तानी सैन्याकडून होणार्‍या आगळीकीला सडेतोड उत्तर दिले जात आहे. सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) जवानांच्या तुकड्या सीमेवर जागोजागी तैनात केल्या जात आहे. 
 
दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला आहे. या घडमोडीच्या पार्श्वभूमीवर नौदलाच्या लढाऊ जहाजांनी अरबी समुद्रात काल पुन्हा युद्धसराव केला. जहाजविरोधी अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. त्या माध्यमातून नौदल आक्रमक कारवाईसाठी सज्ज असल्याचे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. भारतीय समुद्र हद्दीचे संरक्षण करण्याची ताकद नौदलात आहे, याची प्रचिती या माध्यमातून दिली आहे. 
 
अरबी आणि  हिंद महासागरात कोठेही आणि कधीही कारवाई करण्याचे आणि समुद्र सीमांचे संरक्षण करण्याची धमक असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दोनच दिवसांपूर्वी सुरत युद्धनौकेवरुन क्षेपणास्त्राची चाचणी नौदलाने करुन पाकिस्तानला इशारा दिला होता. त्यानंतर काल पुन्हा युद्धसराव करुन नौदलाच्या मारक क्षमतेची चुणूक दाखवली असल्याचे मानले जात आहे.  दरम्यान, अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय समुद्र सीमेवर लढाऊ विमानवाहू आयएनएस विक्रांत, सुरतसह विविध युद्धनौकांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. 

६४ हस्तकांवर छापे

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांच्या ६४ हस्तकांच्या घरावर छापा घातला. बेकायदा कृती प्रतिबंधक कायदा (यूएपीए) अंतर्गत तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हस्तकांच्या विविध ठिकाणी छापे टाकले. तसेच कायद्यानुसार गुन्हे दाखल केले. कारवाई करुन दहशतवाद्यांचे जाळे नष्ट केले  जात आहे.  न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि कायदेशीर अनुमती घेतल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांच्या निरीक्षणाखाली छापे टाकले जात आहेत. कारवाईत शस्त्रे, देशविरोधी कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आदी जप्त केले जात आहेत.  त्यांचा वापर पुरावे म्हणून केला जात असून ते पुढील तपासासाठी उपयुक्त ठरणार आहेत. तसेच संबंधित हस्तकांची ओळख पटवून आणि शहानिशा करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन पुढील कारवाई केली जात आहे. 

पाकिस्तानी सैन्याचा तिसर्‍यांदा गोळीबार

पाकिस्तान सैन्याने शनिवारी रात्री युद्धबंदी कराराचे तिसर्‍यांदा उल्लंघन करुन भारतीय हद्दीच्या दिशेने पुन्हा गोळींबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून देण्यात आले, असे अधिकार्‍यांनी रविवारी सांगितले. २६ आणि २७ एप्रिलच्या मध्यरात्री पाकिस्तानी चौक्यांतून सैनिकांनी छोट्या हत्यारांनी गोळीबार केला. प्रामुख्याने तुतमारी गली आणि रामपूर क्षेत्रात तो करण्यात आला. भारतीय जवानांनी छोट्या हत्यारांचा वापर करुन त्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

आणखी तीन दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांकडून जम्मू आणि काश्मीरमध्ये विविध ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात कारवाई जोमाने सुरू आहे. त्या अंतर्गत बंदीपुरा, पुलवामा आणि शोपियाँ जिल्ह्यांतील तीन दहशतवाद्यांची घरे रविवारी जमिनदोस्त करण्यात आली. गेल्या वर्षी दहशतवादी कारवायात सहभागी झालेला शोपियॉ जिल्ह्यातील वांडिना येथील अदनान शफी यांचे घर शनिवारी पाडले. पुलवामातील अमीर नाझीर यांचे आणि बंदीपुरातील लष्कर ए तोयबाचा दहशतवादी अहमद शेरगोजी याचेही घर जमिनदोस्त करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ९ दहशतवद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. 
 

Related Articles